प्रतिनिधी /उस्मानाबाद
उजनी प्रकल्पात पुरेसे पाणी असूनही नगर पालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरवासीयांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.यापूर्वी पाण्याची अडचण दूर करण्यासंदर्भात आपणासोबत दोन वेळा दूरध्वनीवर केलेल्या चर्चेेनुसार तातडीने नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी,कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन पाणीपुरवठ्यातील त्रुटी त्वरित दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत व्हावा. यासाठी तांत्रिक दृष्ट्या सक्षम वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहराला दुष्काळी परिस्थितीत टंचाईच्या झळा बसू नये यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत असलेल्या उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यासाठी डॉ.पद्मसिंह पाटील यांनी २००४ साली आरक्षण मंजूर करून घेतले होते. केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी (UIDSSMT) या योजनेअंतर्गत ११४ किमी अंतर असलेली ८ दश लक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची महत्वाकांक्षी योजना एप्रिल २०१३ मध्ये कार्यान्वित करून उस्मानाबाद शहरात उजनी धरणाचे पाणी आणले होते.योजना तयार करताना त्यात भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास शहरासोबत शहरानजीकच्या ग्रामीण भागाला पण पाणी उपलब्ध होऊ शकेल याची तरतूद केली होती. ३.५ ते ४ वर्ष ही योजना योग्य सक्षमपणे चालत होती. सद्यस्थितीत मात्र नगरपालिकेच्या अकार्यक्षम व भ्रष्ट कारभारामुळे योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी योग्य ती तरदूत न केल्यामुळे गळती वाढली व प्रतिदिन ८ दशलक्ष लिटरऐवजी केवळ ४-४.५ दश लक्ष लिटर (MLD)पाणी उपलब्ध होत आहे.परिणामी उजनी धरणात मुबलक पाणी असताना शहरवासीयांना १५-२० दिवसांनी पाणी मिळत आहे. आजची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शहर वासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना योग्य क्षमतेने चालवणे आवश्यक आहे. योजना योग्य क्षमतेने चालल्यास प्रतिदिन ८ एमएलडी पाणी उपलब्ध होईल. जनतेला पाणी विकत घ्यावे लागत आहे तर कांही ठिकाणी महिलांना पाण्यासाठी उन्हात फिरावे लागत आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्चूनही लाभ शहरवासीयांना मिळत नसेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. 
 
Top