प्रतिनिधी | उमरगा
तालुक्यातील मुळजचे ग्रामदैवत जटाशंकर तीर्थक्षेत्र यात्रा महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली असून सकाळी पाडव्याच्या दिवशी काठीचे मानकरी सोयराप्पा परिवाराच्या हस्ते काठीच्या प्रतिष्ठापनेने करण्यात आली. 
तालुक्यासह सीमावर्ती भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुळज गावच्या पूर्वेला एक किमी अंतरावर प्राचीन उत्कृष्ट शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले श्री जटाशंकराचे हेमाडपंती मंदिर आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेली देवस्थानची यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी सोयराप्पा घराण्यातील मानाच्या काठीची प्रतिष्ठापणा करून होते. या यात्रा काळात भजन, कीर्तन आदींसह अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. याची सुरुवात शनिवारी सकाळी काठीची प्रतिष्ठापणा करून करण्यात आली. दुपारी महादेवाच्या कावडीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कावड दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुढीपाडव्या पासून सुरू झालेल्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. दि. १३ एप्रिलला दुपारी बारा वाजून तीस मिनिटानी शिव-पार्वती विवाह सोहळा होणार आहे. दि. १८ एप्रिलला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम रात्री जागर व पहाटे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी शुक्रवारी (दि. १९) सकाळी जटाशंकर मंदिरा पासून मानाची काठी व श्रीच्या पालखीची गावातील प्रमुख मार्गावरून नगारे, ढोल, ताशा, बॅन्ड, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात व आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीत दिवसभर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. २० एप्रिलला नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या दंगली रंगणार आहेत. 
 
Top