* आमदार खासदारांची प्रचाराकडे पाठ
* युतीच्या सभेकडे लक्ष
* मनसेही प्रचारापासून वंचित
उमरगा/माधव सुर्यवंशी
उमरगा व लोहारा तालुक्यात आघाडीच्या उमेदवाच्या प्रचाराने मोठी आघाडी घेतली आहे. पवार व चाकुरकर यांच्या सभेने वातावरण गरम झाले आहे. तर सेना भाजपातील नाराजी दुर न झाल्याने युतीचा प्रचार थंड आहे. सेनेचे आमदार, खासदारच प्रचारापासून चार पाऊले दुर राहिले असुन आता सर्वांच्या नजरा औसा येथे मोदी व ठाकरे यांच्या मंगळवारी होणा-या सभेकडे लागल्या आहेत. तर अदयाप मनसैनिक संभ्रमात आहेत.
उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांना न मिळाल्याने उमरगा व लोहारा तालुक्यातील शिवसेनेत मोठी अस्वस्थता आहे. विद्यमान खासदार यांनी प्रचारात अद्याप सहभाग घेतला नसुन आ. ज्ञानराज चौगुले ही मतदारसंघात फिरकलेले नाहीत. परिणामी सेनेचे कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत असुन भाजपा कार्यकर्त्यांचा ही सक्रीय सहभाग दिसुन येत नाही. यातच शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची व्हीडीओ क्लीप व्हायरल झाल्याने सरसेनेत मोठा हाडकंप माजला आहे. निष्ठावंत शिवसैनिकाना मिळणारी वागणूक व रवि सरावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याच्या इरशेने सरसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे काका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील व शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सुरेश वाले हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचाराची सुत्रे आ. बसवराज पाटील यांनी स्वत:कडे घेतली आहेत. काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आडवा विस्तव जात नव्हता. परंतु नेत्याच्या आदेशानंतर हे वैर कधी निघुन गेले समजुही शकले नाही. यातच जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील व राणा पाटलांचे चिरंजीव मल्हार पाटील यानी उमरगा लोहारा दोन्ही तालुक्यात संयुक्त प्रचार दौरे व काॅर्नर बैठकांचा सपाटा लावला असुन यामुळे दोन्ही तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आघाडीचे उमेदवार रणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ दि. ४ रोजी उमरगा शहरात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठी सभा झाल्याने आघाडीसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे. १ एप्रिल रोजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे व बसवराज वरनाळे यांना मातोश्रीवर बोलावून त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु अदयापही आमदार खासदार प्रचारात सक्रीय न झाल्याने युतीच्या प्रचार थंडावलेलाच आहे. तर आमदार ज्ञानराज चौगुले ही प्रचारापासून अलिप्त राहिले आहेत. मंगळवारी दि. ९ रोजी औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. यावेळी खासदार रविंद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित राहुन सक्रीय होणार का नाही याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे. तर जिल्ह्यातील मनसेचे नेते अद्याप सक्रीय न झाल्याने मनसैनिक ही द्विधा मनस्थितीत असुन आघाडीकडुन योग्य सन्मान न मिळाल्याने मनसेही प्रचारापासून वंचित आहे.
 
Top