सामुदायिक विवाह सोहळ्यात ५३ जोडपी विवाहबद्ध झाली.
प्रतिनिधी /उस्मानाबाद
हजरत ख्वाजा शम्सुद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ५३ जोडपी विवाहबद्ध झाली. सोसायटीचे अध्यक्ष नादेरूल्ला हुसैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह सोहळा पार पडला.
येथील दर्गाह मैदानाच्या परिसरामध्ये रविवारी (दि. ७) सायंकाळी सामुदायीक विवाह सोहळा पार पडला. सोसायटीचे अध्यक्ष सय्यद नादेरुल्ल हुसैनी यांच्या पुढाकारातून सलग ११ वर्षांपासून शहरात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. हे या उपक्रमाचे ११ वर्ष होते. आतापर्यंत या सोहळ्यामध्ये ५२१ विवाह पार पडले आहेत. यावर्षी ५३ जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले. विवाह सोहळ्यासाठी ६१ जोडप्यांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, सर्व बाबींची काटेकोरपणे पाहणी करून केवळ ५३ जोडप्यांची निवड या विवाह सोहळ्यासाठी करण्यात आली. विवाह सोहळ्यात मौलाना जाफर अली खान, मौलाना अय्युब कासमी यांनी मार्गदर्शन व बयान केले. विवाह सोहळ्याचे अध्यक्ष हुसैनी यांनी अध्यक्षीय भाषण करून नवविवाहितांना मार्गदर्शन केले. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांसह सुमारे ११०० स्वयंसेवक, २४ काजी साहब यांच्यासह नगरसेवक बाबा मुजावर, गयासुद्दीन शेख, वाजीद पठाण, जे. के. शेख, आयुब शेख यांनी पुढाकार घेतला. विवाह सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. कारी इस्माईल साहेब यांनी निकाह व दुवा पठाण केले. सूत्रसंचालन शागिर्द शेख यांनी केले. आभार सय्यद शहा यांनी मानले.
सोहळ्यात

जागृती 
सोहळ्यात लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जागृती करण्यात आली. तसेच अल्पसंख्याक मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या जकात फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे कौतुकही केले. संस्थेच्या माध्यमातून २८ विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले आहेत. यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 
Top