उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद आणि बार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कौडगाव येथील एमआयडीसीचा प्रश्न युती सरकारच्या उदासीनतेमुळेच रखडला आहे. येथील सौरऊर्जेवर आधारीत वीजनिर्मिती प्रकल्पाला राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेच खोडा बसला आहे. मागील चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर साधी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची तसदी देखील राज्य सरकारने घेतली नाही. शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांना तर उस्मानाबादकडे फिरकण्यासाठी साधा वेळ देखील मिळाला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांच्या रोजगार संधी सेना-भाजप सरकारमुळे लांबणीवर पडल्या आहेत. दुर्दैवाने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत गेली. उस्मानाबाद जिल्ह्याविषयी सापत्न वागणूक देणार्‍या भाजप-सेना सरकारला आता योग्य जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव, आपसिंगा, ढोकी येथे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री मधुकर चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ शिंदे, युवराज नळे, अमित शिंदे आदी उपस्थित होते. 
उस्मानाबाद हा मराठवाड्यातील मागास जिल्हा आहे. त्यामुळे या भागात उद्योगाला चालना देण्यासाठी आपण राज्यमंत्री असताना कौडगाव येथे अडीच हजार एकर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. दीड हजार एकर जमिनीचे भूसंपादन देखील केले. जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास नसल्यामुळे येथील अर्थकारण शेतीशी निगडीत आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे येथील युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रेाजगार उपलब्ध व्हावा या हेतुने आपण हा प्रकल्प मंजूर करवून घेतला होता. मात्र मागील साडेचार वर्षांच्या काळात साधी निविदा प्रक्रिया देखील या सरकारला पूर्ण करता आली नाही. त्यामुळे वीजनिर्मितीचा विशेष प्रकल्प रखडून पडला आहे. 
कौडगावच्या औद्योगिक क्षेत्रात सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यासाठी 2012 साली आपण जमीन उपलब्ध करून दिली. 50 मेगावॅटचा सौरऊर्जेवर आधारीत वीजनिर्मितीचा प्रकल्प महाजनकोच्या माध्यमातून 2014 साली मंजूर करण्यात आला. मात्र या प्रकल्पाची निविदा दोनवेळा काढून ती रद्द करण्यात आली. शेवटी ऊर्जामंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रलंबित प्रक्रिया सुरू करण्याचा आग्रह धरला. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिने हा प्रकल्प महत्वपूर्ण असल्याची मागणी लावून धरली आणि तो लवकर सुरू व्हावा यासाठी अनेकदा विधी मंडळात आवाज उठवला. सहा महिन्याच्या आत हा प्रकल्प सुरू केला जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी सभागृहात दिले होते. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला आणि रोजगाराला या सरकारच्या दिरंगाईमुळे गतिरोध बसला आहे. 
50 मेगावॅटचा हा प्रकल्प 200 एकर जागेवर उभारला जाणार आहे. उर्वरित जागेत आणखी एक 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत. कौडगाव औद्योगिक क्षेत्रातील वसाहतीमध्ये आणखी उद्योग आणण्यासाठी देखील आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उस्मानाबाद जिल्हा हा कमी पावसाच्या छायेत मोडतो. त्यामुळे येथील पर्जन्यमान अत्यल्प आहे. जिल्ह्यातील वातावरण सौरऊर्जेसाठी अत्यंत पोषक असून जिल्ह्यातील होर्टी, अणदूर आणि केशेगाव येथील सौरऊर्जा प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करावा, यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. त्याला या सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. भविष्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला आणि पर्यायाने रोजगार निर्मीतीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मागील साडेचार वर्षांत युती सरकारच्या अवमानकारक धोरणामुळे जिल्ह्याचे झालेले नुकसान आपण विसरता कामा नये, कौडगाव एमआयडीसी राज्यातील उल्लेखनिय एमआयडीसी म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी या निवडणुकीत मतदार संघातील सवार्ंनी विक्रमी समर्थन द्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. 
 
Top