उमरगा/प्रतिनिधी
 देशातील शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतीउत्पन्न दुप्पट करू म्हणणार्‍या फसव्या युती सरकारने मागील पाच वर्षात शेतीउत्पन्न दुप्पट सुध्दा केले नाही. हमीभावाच्या नावाखाली शेतमालाची लूट करणार्‍या युती सरकारला मतदारांनी त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. 
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे लोकसभा मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्यांनी जनसमुदायाला संबोधित केले. यावेेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार, जनार्दन सांगवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नानाराव भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील सास्तूरकर, माजी सभापती गोविंद पवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य विजयकुमार सोनवणे, सुनिल माने, अ‍ॅड. व्यंकटराव सोनवणे, अ‍ॅड. मल्हारी बनसोडे, किशोर साठे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. मागील पाच वर्षात मोदी सरकारने देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. परंतु अच्छे दिन काही आलेच नाहीत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देतो म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकर्‍यांच्या प्रश्नांविषयी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे भाजपा सरकारवर कसा भरवसा ठेवायचा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंत शेतकर्‍यांच्यासाठी अनेक आंदोलने केले तसेच पीकविमा, अनुदान यासाठी आपण संघर्ष केला. यापुढेही शेतकर्‍यांसाठी संघर्ष चालूच राहील, असे आश्वासन देवून लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला साथ द्यावी, असे आवाहन केले. प्रा. सुरेश बिराजदार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राणाजगजितसिंह पाटील हे कटीबध्द असून विकासासाठी त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन मतदारांना केले. यावेळी जयदेव पवार, अमोल चव्हाण, बाळू मशाळ, भागवत सोनवणे यांच्यासह नारंगवाडी, पेठसांगवी, मातोळा परिसरातील येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top