उस्मानाबद,/प्रतिनिधी-
आपण राज्यमंत्री असताना उस्मानाबाद जिल्हा आणि परिसराच्या औद्योगिक विकासासाठी कौडगाव एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी मिळविली. अडीच हजार एकरांपैकी दीड हजार एकर जमिनीचे भूसंपादनही केले. मात्र मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात विरोधी उमेदवाराने उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीसाठी काय केले ? खोटे आश्वासन देवून तरूणांच्या भावनांशी खेळणार्या सेना उमेदवाराला राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता असताना एकही नवा उद्योग मंजूर करून घेता आला नाही. उद्योगमंत्री शिवसेनेचे असताना सेना उमेदवाराने उस्मानाबादच्या उद्योगासाठी काय केले, याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडावा. केवळ खोटी आश्वासने देवून तरूणांच्या भविष्याशी खेळू नये. सजग मतदार खोटारड्या आश्वासनांना अजिबात बळी पडणार नाहीत, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विरोधी उमेदवाराचा समाचार घेतला. 
परंडा तालुक्यातील कंडारी येथे गुरूवार, 11 एप्रिल रोजी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. आमदार राहुल मोटे, दादासाहेब पाटील सोनारीकर, सुभाषसिंह सिद्धीवाल, दादासाहेब खरसडे, रणजितसिंह पाटील, विलास शाळू, संदीप खोसे पाटील, रणजीत मोटे, नवनाथ जगताप, धनंजय पाटील, विश्वास मोरे, बापू मिस्किन, राहुल बनसोडे, शंकर घोगरे, पंकज पाटील, नामदेव भाग्यवंत, हनुमंत कोलते, धनंजय मोरे, जयसिंग गोरे, उध्दव शिंदे, अंगद घोगरे, शिवा करळे, सागर शिंदे, हनुमंत शिंदे, लक्ष्मण भोजने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
देशातील आणि आपल्या भागातील महत्वाचे प्रश्न संसदेत मांडून जनतेला आधार देण्याइतके बळ आता शिवसेनेत राहिलेले नाही. मागील पाच वर्षात फसवे आश्वासन देणारांसोबत सत्तेची फळे उपभोगत सेना उमेदवाराने स्वतःच्या तुंबड्या भरून घेतल्या आहेत. सत्ता असताना जनतेचे प्रश्न यांना सोडविता आले नाहीत आणि आता निवडून आल्यावर उद्योग निर्माण करणार असल्याच्या थापा मारीत सुटले आहेत. उद्योगमंत्री, पालकमंत्री शिवसेनेचे असताना कौडगाव एमआयडीसीत नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे सेनेच्या उमेदवाराने मागील पाच वर्षात एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यांनी आमदार असतानाही कौडगाव एमआयडीसीसाठी काही केले नाही, आणि नंतरही नाही. कौडगाव जवळून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली आहे. उच्च दाबाची विद्युत वाहिनी आहे व उजनी पाणीपुरवठा योजना देखील आहे.त्यामुळे या सर्व बाबी असल्याने कौडगावला एम आई डी सी उभारणीचा निर्णय घेतला. वीज,पाणी व गॅस या सर्व बाबी उपलब्ध असल्याने आता तिथे फक्त उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आकर्षित करणे एवढंच काम शिल्लक होत.ज्यातून रोजगार निर्मिती होणार आहे.याबाबत आम्ही विधिमंडळात अनेकदा सरकारला मागणी केली.तसेच उद्योगमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करूनप्रत्यक्ष भेटून उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी बैठक घेण्याबाबत मागणी केली, पालकमंत्र्यांना वारंवार भेटून त्याचा पाठपुरावा केला आहे. मात्र सेनेच्या उद्योगमंत्री, पालकमंत्र्यांना कौडगाव एमआयडीसीबाबत साधी बैठक देखील घेतली नाही. हे मतदारांना चांगले माहीत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यासारखे खूप होते. सत्ता असतानाही बेरोजगार युवकांसाठी एकही प्रकल्प या थापाड्या लोकांना सुरू करता आला नाही. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांच्या भावनांशी खेळ करणार्या शिवसेनेला आणि त्याच्या खोटारड्या उमेदवाराला मत मागण्याचा नैतिक अधिकारच नाही.  अशा शब्दात आमदार पाटील यांनी सेना उमेदवाराचा खोटारडेपणा उपस्थित जनसमुदायासमोर मांडला. यावेळी परंडा तालुक्यातील मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
 
Top