उस्मानाबाद /प्रतिनिधी गीतारहस्य ग्रंथाच्या जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकमान्यांवर १३ जुलै १९०८ रोजी न्यायालयात राजद्रोहाचा दुसरा खटला उभा राहिला. त्यांना ६ वर्षे मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. शनिवारी (दि. ३०) या ग्रंथाला १०८ वर्षे पूर्ण झाली. २ नोव्हेंबर १९१० ते ३० मार्च १९११ या कालावधीत तो लिहून पूर्ण झाला. त्यामुळे ३० मार्च हा दिवस गीतारहस्य जयंती म्हणून साजरा होतो. यानिमित्त टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शरद वडगावकर, शिवराज आचार्य, सुदर्शन कुलकर्णी, प्रसाद सोनटक्के, सुमित अचलेरकर, प्रथमेष कुलकर्णी, अनिरुद्ध जवळेकर, शेखर वडगावकर, नारायण कुलकर्णी आदी उपस्थित होते. |