उस्मानाबाद/
प्रतिनिधी -
आपण भाजपची बी टीम आहोत असा आरोप करणाऱ्या शरद पवारांनी आकोल्यात येऊन निवडणूक लढवावी. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण स्वत: घ्यायला तयार आहे. वंचित आघाडीचा उल्लेख बी टीम म्हणून करणारे पवार माढा लोकसभेतून आमची धास्ती घेऊन का माघारी फिरले याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदार संघातून ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. तत्पूर्वी उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वारंवार शरद पवार यांच्या भेटीला का जातात? मागील पाच वर्षांत किमान पाचवेळा त्यांनी व्यक्तीगत पातळीवर पवार यांची भेट घेतली. आमच्याकडे चहा घ्यायला आले तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू असे म्हणत नेमके पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न उपस्थित करत दोघांनी याचे उत्तर देण्याचे आवाहन केले. आपली लढत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अजिबात नाही. भाजप आणि आपल्या लढतीत काँग्रेस राष्ट्रवादीला तिसऱ्याच ठिकाणी राहावे लागणार आहे असे सांगितले. 
 
Top