वाशी- प्रतिनिधी 
तालुक्यातील इंदापूरमध्ये शेजाऱ्याच्या शेतात तोडलेल्या बाभळीच्या झाडाच्या काटाड्या टाकल्यावरून पती-पत्नीस आठ जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
सीमा सुरेश गपाट या व मुलगा गणेश स्वतःच्या शेतात काम करत असताना शेताशेजारी असलेल्या राजेंद्र बाबासाहेब गपाट व बाबासाहेब नागनाथ गपाट यांनी तोडलेल्या बाभळीच्या झाडाच्या काटे असलेल्या फांद्या आमच्या शेतात का टाकल्या असे विचारताच काटाड्या टाकलेले शेत माझ्या मालकीचे आहे असे तुम्हाला काय अडचण आहे, असा जाब विचारत राजेंद्र गपाट व बाबासाहेब गपाट यांनी महिलेस शिविगाळ करत काठीने मारहाण केली. त्यानंतर सीमा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सोडविण्यासाठी आलेल्या महिलेचा पती सुरेश गपाट याला आरोपींसोबत आलेल्या पंडित नरहरी गपाट, विजय नरहरी गपाट, चंद्रकांत एकनाथ गपाट, दमयंती चंद्रकांत गपाट, छाया विजय गपाट, छबूबाई बाबासाहेब गपाट यांनी पकडून हात पिरगाळून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. यामध्ये उजव्या हाताला मार लागला व डाव्या हाताची बोटे व मनगट फ्रॅक्चर झाले. महिला सीमा सुरेश गपाट यांनी दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
Top