धाराशिव (प्रतिनिधी)- शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच शहरातील कचरा डेपो शहराबाहेर हलविणे, नियमित स्वच्छता, तुंबलेल्या गटारी व नाल्यांची स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या तीन दिवसीय स्वाक्षरी मोहिमेला तिसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मोहिमेच्या पहिल्या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश नगर तसेच खाजा नगर येथील शम्स चौक व मदिना चौक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आज तिसऱ्या दिवशी बार्शी नाका परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शहरातील नागरी समस्यांविरोधात आपला आवाज बुलंद केला.
नागरिकांनी स्वाक्षरी करण्यासोबतच शहरातील विविध समस्याही पोस्टरवर लिहून मांडल्या. नियमित कर भरूनही स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. शहरातील कचरा डेपोमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न, अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी व नाल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषद प्रशासनाची तसेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. केवळ कर वसुली न करता शहरातील मूलभूत समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम शहरातील विविध भागांत तीन दिवस राबविण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या प्रश्नांसाठी एकजूट दाखवली. कचरा डेपो शहराबाहेर हलविण्याच्या मागणीला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
बार्शी नाका येथील स्वाक्षरी मोहिमेत धनंजय राऊत, प्रशांत पाटील, खलील सय्यद, ॲड. जावेद काझी, अभिमान पेठे, अंकुश पेठे, प्रभाकर लोंढे, जयसिंग पवार, ज्योतीराम निमसे, ॲड. गणपत कांबळे, हरिदास शिंदे, ॲड. राजूदास आडे, अविनाश रणखांब, संजय गजधने, बाबा मोमीन, मोइब शेख, दयानंद नागापुरे, विश्वजीत बनसोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
