धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. येत्या आठ दिवसांत ऊस दर जाहीर करून शेतकऱ्यांना पहिली उचल चार हजार रुपये व त्यापुढे द्यावी, अन्यथा 16 नोव्हेंबर 2026 पासून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी टोलनाका येथे बेमुदत रास्ता रोको व ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

ऊस दराच्या प्रश्नावर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निवेदने आणि कारखानदारांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला एकही कारखानदार उपस्थित न राहिल्याने बैठक निष्फळ ठरली. दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बैठक झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन आणि साखर कारखानदारांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील कारखानदारांनीही उसाला चार हजार रुपये व त्यापुढे पहिली उचल द्यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

ऊस तोडणी व गाळप सुरू असताना दराचा निर्णय प्रलंबित ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करण्यासारखे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ऊस दराचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा येडशी टोलनाक्यावर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. हे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


 
Top