कळंब (प्रतिनिधी)- ‘दृष्टी आपली, जबाबदारी आमची' हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या रोटरी सेवा ट्रस्ट, धाराशिव संचलित जे. एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालयाच्या कळंब येथील व्हिजन सेंटरने यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे. या एका वर्षाच्या कालावधीत हजारो नेत्ररुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या यशस्वी सेवापूर्ती निमित्त मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी कळंब येथील सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा उपरुग्णालयासमोर, परळी रोड येथे सुरू करण्यात आलेल्या या व्हिजन सेंटरच्या माध्यमातून कळंब शहरासह परिसरातील नागरिकांना नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. तपासणीदरम्यान नेत्रदोष आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी धाराशिव येथील रोटरी सेवा ट्रस्टच्या रुग्णालयात पाठविण्यात येते. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियांसह आवश्यक उपचार केले जातात.
या कार्यक्रमास रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव प्रवीण काळे, कळंब येथील नेत्रचिकित्सक दत्ता वळेकर, सौरभ बनसोडे, अतुल देशमुख, श्रीराम कोकीळ आदी उपस्थित होते. यावेळी अभय देवडा, अच्युत ऊर्फ बाबुराव पौळ, विक्रम गायकवाड, भास्कर करवलकर तसेच रोटरीयन संजय देवडा व संजय घुले यांनी प्रवीण काळे, दत्ता वळेकर व त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रवीण काळे यांनी कळंब शहर व परिसरातील नागरिकांनी दाखविलेल्या विश्वास आणि सहकार्यामुळेच हे सेवाकार्य यशस्वीपणे पुढे नेता आले, असे सांगितले. ट्रस्टच्या माध्यमातून अत्याधुनिक साधनसामग्रीद्वारे नेत्रतपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जात असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परिसरातील गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. एक वर्षात हजारो रुग्णांपर्यंत पोहोचलेली ही नेत्रसेवा कळंबकरांसाठी आरोग्याच्या क्षेत्रातील दिलासादायक ठरत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रोपचार जवळच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे सेंटर महत्त्वपूर्ण ठरत आहे.
