धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दुष्काळ निवारण आणि निर्मुलन समितीच्या वतीने राज्यातील दुष्काळ ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुपालक, मच्छीमार, कारागीर समुह, महिला, विद्यार्थी, वंचित घटकांना तातडीने आर्थिक मदत देवून दुष्कान निवारण्यासाठी प्रवासी उपाययोजना राबविण्यासाठी धाराशिव येथे दि. 02/11/2026 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे, पाणीटंचाई आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर भयानक संकट निर्माण झाले आहे. शेतकरी व बाधित कुटुंबाना प्रति कुटुंब 15000/- रुपये तातडीची आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त गावात पाण्याचे टँकर उपलब्ध करुन द्यावेत. जलसंधारणाची कामे निर्माण करुन रोजगार निर्मिती करावी. दुष्काळग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांची घेतलेली शैक्षणिक फी परत द्यावी. कमवा, शिकवा योजना प्रभावीपणे राबवावी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करावा, रोजगार निर्माण न झाल्यास, बेरोजगार भत्ता द्यावा, मजूरीचे दर वाढवावे, चारा छावण्या उभाराव्यात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून प्रति व्यक्ती 10 किलो धान्य उपलब्ध करुन द्यावे, कालबद्ध दुष्काळ निवारण आराखडा निर्माण करावा. मराठवाडयातील दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. वृक्ष संवर्धनासाठी वनक्षेत्राच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा. लाडकी बहिण योजनेच्या त्रुटीची त्वरीत पुर्तता करावी, दुष्काळग्रस्त भागात पाणी टंचाईमुळे साथीचे आजार टाळण्यासाठी औषधांचा पुरवठा करावा. फिरती वैद्यकीय पथके निर्माण करुन सेवा द्याव्यात. दुष्काळग्रस्त भागात लघु उद्योजकांच्या सक्तीच्या वीज वसुलीस स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये. शेतकरी, शेतमजूर, ग्रामोद्योग सर्वांच्या कर्ज वसूलीस काही महिने स्थगिती द्यावी, बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावेत. मत्स्य शेती, मत्स्य व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष गटांना शासनाने सानुग्रह अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त भागात बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवावी, इत्यादी मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आज महाराष्ट्र दुष्काळ निवारण निर्मुलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर रामेश्वर शेंडगे, बाबु शिंदे, अरुण सोनटक्के, सुरेश शेळके, विजय गायकवाड, रघुराम आगळे, नागनाथ काळे, गोरोबा माने, जे.बी. लोंढे इत्यादी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top