भुम (प्रतिनिधी)- मुस्लिम एकता सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने वार्षिक अहवाल पुणे येथे प्रकाशित करण्यात आला. माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या वतीने या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजातील गोरगरीब, गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच सामाजिक सलोखा, एकता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.
संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, गरजू कुटुंबांना मदत करणे, शैक्षणिक व सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देणे तसेच समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले जात आहे. या तीन वर्षांच्या कार्याचा आढावा वार्षिक अहवालाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. आमदार डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी संघटनेच्या तीन वर्षांच्या सामाजिक वाटचालीचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेले समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या प्रोत्साहनामुळे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात अधिक जोमाने समाजसेवेचे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. “एकता हीच शक्ती, समाजसेवा हाच धर्म आणि जनसेवा हेच ध्येय” या विचाराने प्रेरित होऊन मुस्लिम एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. असे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या वतीने सांगण्यात आले. व तसेच भूम परांडा वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल आमदार तानाजीराव सावंत साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी राजू भाई चाऊस,रशीद शेख, अमीर सय्यद, लतीफ सय्यद, असीम शेख, वसीम चाऊस,फिरोज फकीर, अश्विनीताई साठे, गायकवाड ताई, अक्षय चेडे, संतोष गोरे,अखिलेश जमादार, आदी उपस्थित होते.
