धाराशिव (प्रतिनिधी)- शहरासह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, धाराशिव नगरपरिषदेसाठी 3 नवीन अग्निशमन वाहने खरेदी करण्यास महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. या तीन वाहनांच्या खरेदीसाठी एकूण 450.90 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. धाराशिव शहरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि संभाव्य आगीच्या घटनांचा विचार करून अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे धाराशिव नगरपरिषदेसाठी 4 नवीन अग्निशमन वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 'महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर)' अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेसाठी 3 नवीन अग्निशमन वाहने खरेदी करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे धाराशिव शहरातील अग्निशमन यंत्रणेची क्षमता वाढणार असून, आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. धाराशिवच्या नागरिकांची सुरक्षितता आणि शहराचा सर्वांगीण विकास यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही कायम राहतील.

 
Top