धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या जलसंपदा विभागाने दिले आहेत. पुढील नियोजित पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासोबत हे पाणी सोडण्याची कार्यवाही करण्याबाबत कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना महाराष्ट्राच्या अवर सचिव कविता देसाई यांनी लेखी निर्देश दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना 17 नोव्हेंबर 2026 रोजी याबाबत पत्र देण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य देत एक टीएमसी पाण्याची मागणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पातील धाराशिव उपसा सिंचन योजना क्रमांक दोनच्या पहिल्या टप्प्यांतर्गत हा विषय आहे. उजनी जलाशयातून पाणी उपलब्ध करून ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील घाटणे बॅरेजमध्ये साठविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला होता. तेथून धाराशिव जिल्ह्यातील आवश्यक साठवण तलावांमध्ये पाणी पोहोचविण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

राज्य शासनाने धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचेही पत्रात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. उजनीतून पाणी सोडल्यानंतर ते घाटणे बॅरेजपर्यंत पोहोचताना अंतर आणि बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी घाटणे बॅरेजद्वारे नियोजित असलेल्या पुढील पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनासोबतच हे पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. घाटणे बॅरेजपासून रामदरा तलावापर्यंत कृष्णा-मराठवाडा लिंकच्या पाच टप्प्यांतील उपसा सिंचन प्रणालीद्वारे पाणी वाहून नेण्यात येणार आहे. या प्रक्रियेत पाणी वाया जाणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निदर्शनास जिल्ह्यातील गंभीर आणून दिली होती. जिल्ह्यात केवळ 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उपलब्ध पाणीसाठ्यातून पुढील दहा महिने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविणे अत्यंत कठीण असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले होते. तसेच उजनी धरणातून 1 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्याचवेळी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत सकारात्मकतेने आपली मागणी मान्य केली. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेत शासन आदेश निर्गमित केला. यासाठी प्रत्येक टप्प्यावर आपला सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. गरज पडल्यास अधिकचे पाणी देण्याबाबत देखील शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तीव्र दुष्काळी संकटात धाराशिव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा आहे. 


संकटकाळात देवेंद्रजी धावून आले, जिल्हावासियांतर्फे त्यांचे आभार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विनंती मान्य करत विशेष बाब म्हणून उजनीतून एक टीएमसी पाणी देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे दुष्काळात धाराशिव जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे. या पाण्यामुळे पशुधनाचीही सोय होणार आहे. संकटाच्या काळात देवेंद्रजी जिल्ह्याच्या मदतीला एखाद्या देवदूताप्रमाणे धावून आले आहेत. याबद्दल जिल्हावासियांच्या वतीने मुखमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेबांचे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आभारही मानले आहेत.


 
Top