धाराशिव (प्रतिनिधी)- येडशी टोल नाक्याजवळ सोमवार दि. 16 नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेचे आंदोलन चालू होते. यावेळी काही पत्रकार वार्तांकन करण्यासाठी त्याठिकाणी गेले होते. रास्ता रोकोच्या आंदोलनामुळे काही प्रवाशी चिडल्याने प्रवाशी व आंदोलक यांच्यात बाचाबाची सुरू झाली. वृत्तवाहिन्याचे काही पत्रकार हे कर्व्हर करत असताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध पत्रकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.
धक्काबुक्की व पोलिसांच्या मारहाणीमध्ये सागर जाधव, काकासाहेब कांबळे, वैभव पारवे हे जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे चार ते पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे काही प्रवाशांनी आंदोलकांना लहान मुले व महिला आहेत. आमच्या बसेस जावू द्या, अशी मागणी केली. यावरून आंदोलक व प्रवाशी यांच्यात बाचाबाची होवून हाणामारीचा प्रकार घडत होता. त्याचे कर्व्हरेज करण्यासाठी काही पत्रकारांनी प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोपी करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर विविध पत्रकारा संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या स्वाक्षरी आहे. या निवेदनाच्या प्रती पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई, विशेष पोलिस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.