कळंब, (प्रतिनिधी)-  शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला अचानक आग लागून मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, कळंब नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने दाखविलेल्या विलक्षण तत्परतेमुळे सुमारे 10 एकर ऊस जळून खाक होण्यापासून वाचला. ही घटना रविवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी दुपारी पिंपळगाव डोळा येथील शेतकरी सूर्यकांत संभाजी गुजर यांच्या शेतात घडली.

शेतातील विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या पिकाने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच कळंब नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने अवघ्या 5 ते 7 मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे, शेतात चिखल असल्याने अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचविणे हे मोठे आव्हान होते. मात्र, चालकाने प्रसंगावधान, धाडस आणि वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवत अग्निशमन बंब चिखलात न फसता थेट घटनास्थळी पोहोचविला. त्यामुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले.

अग्निशमन दलाच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सूर्यकांत गुजर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा अंदाजे 10 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचला. अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता होती. या मोहिमेत अग्निशमन दलाचे चालक गजानन जाधवर व सुगत वाघमारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे मोठे संकट टळले. या कामगिरीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले असून, कळंब नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संकटाच्या क्षणी वेळेवर धावून येणारे अग्निशमन दलच शेतकऱ्यांसाठी ठरले संकटमोचक!

 
Top