भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करून नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूम नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या कामांचे मंगळवारी, दि. 3 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मागील वर्षभरापासून शहरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला नसताना आता रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्याने नागरिकांमध्ये अपेक्षा व्यक्त होत आहेत.
नगरसेवक, विविध पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शहरातील वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे आवश्यक बनले आहे. अनेक वसाहती, गल्लीबोळ आणि वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था सुधारल्यास नागरिकांची दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहे. याच उद्देशाने जिल्हा नियोजन व विकास समितीच्या जिल्हास्तरीय योजनेतून रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
या विकासकामांत अविनाश नगरमधील सोनवणे घर ते शिंदे घर रस्ता, सावरगाव रोड ते इंदिरानगर रस्ता, गणेश गाढवे घर ते साबळेवाडी रस्ता, वरद हॉटेल ते विठ्ठल मंदिर रस्ता, जिकरे घर ते रेवडकर घर रस्ता आणि विजयनगरमधील सय्यद घर ते राजू शेख घर रस्त्याचा समावेश आहे. तसेच शासकीय दूध योजना ते सागर शेटे घर रस्ता, राम बोत्रे घर ते बन्सी काळे घर रस्ता, माऊली घर ते पार्टी रोड रस्ता आणि सोनटक्के घर ते शिंदे घर या रस्त्यांची कामेही प्रस्तावित करण्यात आली आहेत. याशिवाय कसबा भागातील मोमीन घर ते महाजन रस्त्याच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर संबंधित भागांतील नागरिकांना पावसाळ्यात चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अंतर्गत रस्ते चांगले झाल्यास दुचाकी, चारचाकी वाहने तसेच पादचाऱ्यांची वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू होत असली, तरी या कामांचा नागरिकांना प्रत्यक्ष आणि दीर्घकालीन लाभ मिळण्यासाठी नियोजन, दर्जेदार साहित्याचा वापर, कामांची गुणवत्ता आणि निर्धारित वेळेत पूर्तता या बाबींना प्राधान्य देणे महत्त्वाचे ठरणार आहे. रस्त्यांच्या कामांदरम्यान पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या आणि इतर मूलभूत सुविधांचा विचार करून कामे केल्यास भविष्यात रस्ते पुन्हा खोदण्याची वेळ टाळता येऊ शकते.
भूम शहरातील पायाभूत सुविधांचा विकास हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे भूमिपूजनानंतर कामांना प्रत्यक्ष गती मिळणे, ती दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाणे अपेक्षित आहे. ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्यास शहरातील अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागणार आहे.या वेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, ॲड. संदीप खरवडे, ॲड. विलास पवार, नगरसेवक सूरज गाढवे, संदीप नाईकवाडी, अभिजित शेटे, तोफिक कुरेशी, भाग्यश्री माने, रीमा शिंदे, आबासाहेब मस्कर, दत्ता काळे, नवनाथ रोकडे आणि प्रदीप साठे उपस्थित होते. तसेच उद्योजक संजय साबळे, मामू जमादार, श्रीराम भोसले, सुनील माळी, राजा माने, अतुल उपरे, नितीन साठे, सहदेव गाढवे, कलीम पठाण, मुशीर शेख, अमोल सुरवसे, सागर टकले आणि रईस काझी यांच्यासह विविध पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
