धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांच्या वतीने खेड, तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथे “ एक दीप मदतीचा शेतकरी व गरजूंसाठी उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खेेड गावाचे सरपंच सुनिल गरड यांनी भुषविले. उपसरपंच गणेश गवाड, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेेश चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद कोकणे, डॉ. मेघश्याम पाटील, डॉ. विक्रम शिंदे, डॉ. राधाकृष्ण तिगोटे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रमाधिकारी डॉ. गोविंद कोकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांंनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. सर्वांची दिवाळी प्रकाशमान व्हावी व आत्म प्रतिष्ठा जपली जाणे महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले. सरपंच सुनिल गरड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी लाभार्थींची निवड गरजवंत व निकड या बाबींवर केल्याचे सांगितले. दिवाळी हा सण सर्वांच्या आयुष्यात उत्साह व आनंद निर्माण करतो, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र आणि विशेषत: मराठवाडा विभागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजूर बांधव अडचणीत सापडले आहेत. मान्यवरांच्या हस्ते 40 किट्सचे वाटप करण्यात आले. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. मेघश्याम पाटील यांनी आभार मानले.
