धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवच्या शासकीय आरोग्यसेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून,उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या सीएसआर निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव आणि जिल्हा स्त्री रुग्णालय धाराशिव यांना प्रत्येकी एक असे दोन अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ॲनालायझर प्रदान करण्यात आले आहे.
या मशीनमुळे रक्त तपासणी अहवाल अधिक जलद उपलब्ध होण्यास मदत होणार असून, रुग्णांचे निदान व उपचार अधिक प्रभावी होणार आहेत. विशेषतः आपत्कालीन आणि गंभीर रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.मशीनचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र डी. चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे प्रमुख योगेश गुरधळकर,डॉ.सुरेश ए. चावरे, डॉ.स्वाती आर.पांढरे,डॉ.अब्दुल मुबश्शिर सिद्दिकी,ट्रान्सएशिया कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर चंद्रकांत महाजन,डॉ.विवेक कोळगे व प्रयोगशाळेतील कर्मचारी उपस्थित होते. सीएसआर निधीतून आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांनी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या योगदानामुळे धाराशिवच्या सार्वजनिक आरोग्यसेवेला मोठे बळ मिळणार आहे. या आधुनिक उपकरणांमुळे सर्वसामान्य रुग्णांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण तपासणी सुविधांचा लाभ मिळणार असून, धाराशिवच्या आरोग्यसेवेला नवी दिशा मिळणार आहे.
