उमरगा (प्रतिनिधी)- राज्यपाल जिष्णू देव वर्मा दुष्काळी दौऱ्यावर आले असता आमदार प्रवीण स्वामी यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. यामध्ये 1993 च्या भूकंपग्रस्त 37 पुनर्वसित गावांच्या भौतिक सुविधांसाठी विशेष निधी मिळावा. उमरगा-लोहारा तालुक्याच्या कायम दुष्काळावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, भाविकांच्या सोयीसाठी श्री तुळजाभवानी भक्ती मार्ग (पदपथ) बांधण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन देऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन राज्यपालांचा सत्कार केला.
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा-लोहारा हा अनेक संकटांचा सामना करणारा मतदारसंघ आहे. विधानसभा क्षेत्रातील या 37 भूकंपग्रस्त पुनर्वसित गावांसाठी “भूकंप पुनर्वसन विशेष दुरुस्ती व पायाभूत सुविधा पॅकेज” म्हणून दरवर्षी स्वतंत्र 100 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात यावा. जिल्ह्यातील उमरगा-लोहारा तालुका पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. येथे दर 3 ते 4 वर्षांनी दुष्काळ येतोच. एल निनो हा यावर्षीचा प्रभाव असला तरी येथील दुष्काळ हा कायमस्वरूपी आहे. तेरणा व बोरी नदीचे खोलीकरण आणि साखळी बंधारे बांधणे व जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवादरम्यान आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पायी चालत उमरगा मार्गे तुळजापूरला येतात. राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरून चालताना दरवर्षी अनेक भाविक अपघातात मृत्युमुखी पडतात. अनेक जण जखमी होतात व वाहतुकीसही मोठा अडथळा होतो. आंध्र तेलंगणा सीमेपासून उमरगा मार्गे तुळजापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गालगत भाविकांसाठी सुरक्षित पदपथ बांधून त्यास “श्री तुळजाभवानी भक्ती मार्ग“ असे नाव देण्यात यावे आदी मागण्यां निवेदनात करण्यात आल्या आहेत.
