तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा अत्यल्प पावसामुळे तुळजापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता दिवाळीचा सण कसा साजरा करायचा, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे शहरात दिवाळीच्या खरेदीची लगबग, रोषणाई आणि उत्साहाचे वातावरण दिसत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरात मात्र चिंतेचे आणि निराशेचे सावट पसरले आहे.

यापूर्वी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून गोरगरीब नागरिकांना आणि पात्र लाभार्थ्यांना ‌‘आनंदाचा शिधा' वितरित केला जात होता. या माध्यमातून सणासुदीच्या काळात सामान्य कुटुंबांना काहीसा दिलासा मिळत होता. मात्र यंदा दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाचा शिधा ही केवळ योजना नसून सण साजरा करण्यासाठी मिळणारा एक छोटासा आधार होता. यंदा तोही हिरावला गेल्याने ‌‘दुष्काळात तेरावा महिना' अशी भावना व्यक्त केली जात आहे.


पाच हजारांची मदत शेतीच्या मशागतीतच खर्च!

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. मात्र खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतजमीन तयार करणे, मशागत करणे आणि बियाणे व इतर शेती खर्च भागविण्यातच ही मदत खर्च झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी हातात पैसा शिल्लक राहिलेला नाही. शासनाकडून मिळालेली मदत शेतीच्या गरजांसाठीच खर्च झाल्याने सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांना सतावत आहे.


माहेरवाशिणींनाही दिवाळीसाठी बोलावण्याची चिंता!

दिवाळी म्हणजे आनंदाचा, नात्यांचा आणि आपुलकीचा सण. या सणासाठी माहेरवाशिणींना घरी बोलावणे, मुलाबाळांसाठी नवीन कपडे घेणे, फराळ तयार करणे आणि घरात गोडधोड करणे ही ग्रामीण भागातील परंपरा आहे. मात्र यंदा आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक शेतकरी आपल्या लेकींनाही दिवाळीसाठी माहेरी बोलावण्याची परिस्थिती नसल्याची खंत व्यक्त करीत आहेत. घरातील दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले असताना दिवाळीचा अतिरिक्त खर्च कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.


दिवाळीचा सण, पण बळीराजाच्या घरात निराशेचा अंधार!

ग्रामीण भागात अनेक शेतकरी यंदा दिवाळीचा सण साधेपणाने, अगदी भाजी-भाकरी खाऊन साजरा करण्याच्या मनःस्थितीत आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलवायचा असला तरी खिशात पैसा नसल्याने पालक हतबल झाले आहेत. एका बाजूला बाजारपेठांमध्ये दिवाळीची खरेदी सुरू असून, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या घरात मात्र आर्थिक विवंचना आहे.

दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात सणासुदीच्या काळात मिळणारा आनंदाचा शिधाही यंदा मिळत नसल्याने शासनाने दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सामान्य कुटुंबांच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी यंदा तुळजापूर तालुक्यातील अनेक बळीराजासाठी तो आनंदापेक्षा संघर्षाचा आणि काळजीचा सण ठरणार असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.


 
Top