कळंब (प्रतिनिधी)- राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराचा फटका आता कळंब तालुक्यातील प्रवाशांना बसत असून, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या लांबपल्ल्याच्या बससेवा बंद आणि मार्गांतरित केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. निलंगाछत्रपती संभाजीनगर ही गेल्या 40 ते 50 वर्षांपासून मुरूडढोकीकळंब मार्गे धावणारी बस गेल्या 15 ते 20 दिवसांपासून लातूर विभागाने अंबाजोगाई कारखाना मार्गे वळविल्याने कळंबच्या प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. या बससह बंद करण्यात आलेल्या अन्य मार्गांवरील सेवा पूर्ववत न केल्यास उपोषण करण्याचा इशारा प्रवासी मित्र संघटनेचे प्रा. मोहन जाधव यांनी दिला आहे.


वर्षानुवर्षांचे मार्ग बदलले; प्रवाशांनी जायचे तरी कसे?

निलंगा-छत्रपती संभाजीनगर बस कळंबमार्गे सुरू असल्याने अनेक वर्षांपासून प्रवाशांना त्याचा लाभ मिळत होता. मात्र, अचानक मार्ग बदलल्याने कळंबसह परिसरातील प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील बससेवा बंद होत असतील, तर सामान्य प्रवाशांनी दाद मागायची कोणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

कळंब-अक्कलकोट, कळंब-जालना आणि कळंब-नांदेड यांसह अन्य लांबपल्ल्याच्या मार्गांवरील बससेवा बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याऐवजी उपलब्ध सेवाच कमी होत असल्याने एसटी महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


तांदूळजा-शिराढोणमार्गे संभाजीनगर, पुणे बस सुरू करा!

निलंगा-छत्रपती संभाजीनगर बस पूर्वीच्या मुरूड-ढोकी-कळंब मार्गावरून तातडीने पूर्ववत सुरू करावी. तसेच तांदूळजा-शिराढोणमार्गे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या शहरांसाठीही बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रा. मोहन जाधव यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

प्रवाशांना लांबचा वळसा घालण्याची वेळ येऊ नये, यासाठी महामंडळाने प्रवाशांची संख्या, मार्गाची गरज आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. बंद बससेवा तातडीने सुरू न केल्यास प्रवासी मित्र संघटनेच्या वतीने आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


डिजिटल बोर्डावर गावाचे नाव गायब; जाहिराती मात्र झळकतात!

कळंब आगारात आधुनिकतेच्या नावाखाली शिवाई आणि राजमाता जिजाऊ या नव्या बस दाखल झाल्या; मात्र डिजिटल फलकावरील माहितीबाबत प्रवाशांच्या तक्रारी समोर येत आहेत. बसच्या डिजिटल बोर्डावर हैदराबाद आणि अशोक लेलँड कंपनीच्या जाहिराती झळकत असताना, बस नेमकी कोणत्या गावाकडे किंवा शहराकडे जात आहे, याचा उल्लेख नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

प्रवाशांना बसचे गंतव्य समजण्यासाठीच डिजिटल फलकाचा उपयोग होत नसेल, तर हे आधुनिक तंत्रज्ञान नेमके कोणासाठी? जाहिरातींसाठी डिजिटल बोर्ड आणि प्रवाशांसाठी संभ्रम, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महामंडळाने या फलकांवर बसचे अंतिम ठिकाण व मार्ग स्पष्टपणे दाखवावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.


 
Top