तुळजापूर (प्रतिनिधी)-  संविधान दिन आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी तुळजापुरात आयोजित रक्तदान शिबिरात 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.

रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि एनआयएमए डॉक्टर्स संघटनेच्या संयुक्त विद्यमाने विठाई हॉस्पिटल येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे अध्यक्ष अमर  हंगरगेकर, रो. दत्ता अंबर, रो. डॉ. श्रीराम नरवडे, डॉ. कार्तिक यादव, डॉ. प्रशांत मोठे, डॉ. किरण पवार, डॉ. सिद्धार्थ साळुंखे, डॉ. विकास क्षीरसागर, डॉ. वट्टे, डॉ. शित्रे, लोकसेवा फाउंडेशनचे पंकज रहाणे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य आनंद दादा कंदले, युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, ओडीसीए तालुकाध्यक्ष रो. संतोष लोखंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असून, रुग्णांची वाढती संख्या आणि रक्ताची निकड लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा, या सामाजिक भावनेतून रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचे डॉ. श्रीराम नरवडे यांनी सांगितले. या उपक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. संविधानातील समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा प्रत्यय रक्तदानाच्या या उपक्रमातून आला.


 
Top