तुळजापूर (प्रतिनिधी)- तीर्थक्षेत्र तुळजापुरात श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. रेल्वे स्टेशन आणि न्यायालयाच्या सुविधांमुळे परिसरातील जमिनींना सोन्याचा भाव आला असून, याच संधीचा फायदा घेत अतिक्रमणांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप होत आहे. प्रथम पत्र्याचे डबे उभारायचे, त्यानंतर हळूहळू पक्के बांधकाम करायचे आणि पुढे प्रशासनाकडे सोयी-सुविधांची मागणी करून मौल्यवान जागा बळकावण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून जमिनी खरेदी करणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे; तर दुसरीकडे अतिक्रमण करून झोपडपट्ट्या उभारणाऱ्यांना मतांच्या राजकारणातून पाणी, रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या दुहेरी भूमिकेमुळे अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळत असल्याची भावना शहरवासीयांतून व्यक्त होत आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यामुळे तुळजापूरच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा असताना, शहरातील मोकळ्या जागांवर अतिक्रमण करून भविष्यात त्या जागांवर हक्क सांगण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. वेळीच कारवाई न झाल्यास सार्वजनिक व मोकळ्या जागा अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीती आहे.

त्यामुळे तुळजापूर नगरपालिकेसह संबंधित प्रशासनाने अतिक्रमणांची निष्पक्ष तपासणी करून बेकायदा कब्जे हटवावेत, अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सार्वजनिक जागा मोकळ्या कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. तीर्थक्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी अतिक्रमणांबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. 

 
Top