धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या 13 जुलैच्या शासन निर्णयानुसार बंद करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजना पुन्हा सुरू कराव्यात, तसेच प्रलंबित लाभांचे अर्ज तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भांडी संच, सुरक्षा संच, शैक्षणिक अर्थसहाय्य, आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, घरकुल, विवाह अर्थसहाय्य, अपघात विमा व मृत्यूनंतरचे अर्थसहाय्य अशा योजना बंद झाल्याने राज्यातील लाखो बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे 13 जुलैचा शासन निर्णय रद्द करून सर्व योजना पूर्ववत सुरू कराव्यात आणि ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे रोजगाराअभावी अडचणीत सापडलेल्या बांधकाम कामगारांना दरमहा तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अध्यक्ष आनंद भालेराव, उपाध्यक्ष नंदकुमार मानाळे, रवि पवार, सुरज भालेराव, आशा लोंढे, सरदार शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
