धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर जी 99 नांदी संमेलने होत आहेत. त्यापैकी धाराशिव येथे 29 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या नांदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती देवगिरी प्रांत संघटन मंत्री युवराज नळे, साहित्य भारती धाराशिव जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे, कार्याध्यक्ष सुनिता गुंजाळ कवडे व जिल्हा मंत्री प्रा डॉ कृष्णा तेरकर यांनी दिली आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, जिल्हा शाखा धाराशिव यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याच्या स्वागताध्यक्षपदी यापूर्वीच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राजेंद्र अत्रे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान, अभ्यासपूर्ण कार्य, साहित्यिक चळवळीतील सक्रिय सहभाग आणि सामाजिक प्रश्नांविषयीची जाणीव लक्षात घेऊन त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचा व्यापक वैचारिक व्यासंग आणि साहित्यिक अनुभव या उपक्रमाला निश्चितच दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठी साहित्याच्या शंभराव्या संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांच्या मालिकेत धाराशिवचा समावेश झाला आहे. यापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविलेल्या याच भूमीत शतकोत्सवी साहित्य सोहळ्याची नांदी होत असल्याने या उपक्रमाला विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या सारख्या प्रामाणिक व अनुभवी व्यक्तीचे सकारात्मक विचार नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास निमंत्रक युवराज नळे व अध्यक्ष भैरवनाथ कानडे यांनी व्यक्त केला.

धाराशिव चे ग्रामीण वास्तव! जिल्ह्यातील सातत्यपूर्ण दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, शेतीसमोरील आव्हाने, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण जीवनातील सामाजिक-आर्थिक प्रश्न यांवर साहित्याच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होणार आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, मातीशी असलेले नाते, पाण्यासाठीचा संघर्ष आणि ग्रामीण समाजाच्या जगण्यातील वास्तव साहित्यिक अभिव्यक्तीतून मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

 
Top