मुरूम (प्रतिनिधी)- मुरुम येथील भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत (राजू) मिनियार यांचे सुपुत्र डॉ. गौरव अरुणा श्रीकांत मिनियार यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.एस. ऑर्थोपेडिक्स (अस्थिरोग शल्यचिकित्सक) ही उच्च पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल मुरूम शहरासह संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

डॉ. गौरव यांनी शालेय जीवनापासूनच अभ्यासात आपली हुशारी व सातत्य टिकवून ठेवत यशाची परंपरा कायम राखली आहे. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूम येथून तर उच्च माध्यमिक (11 वी व 12 वी) शिक्षण लातूर येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधून त्यांनी एम.एस. ऑर्थोपेडिक सर्जन ही पदव्युत्तर पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.

त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार सुजितसिंह ठाकूर, संताजी चालुक्य, अभय चालुक्य यांच्यासह मुरूम शहरातील सर्व डॉक्टर, मान्यवर, मित्रपरिवार व नागरिकांनी डॉ. गौरव यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून विशेष अभिनंदन केले. डॉ. गौरव यांच्या हातून भविष्यात अशीच उत्तम समाजसेवा घडो, अशा शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस सर्व स्तरातून भरभरून उदंड शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top