भूम (प्रतिनिधी)-  भूम-परंडा-वाशी या रेल्वे सुविधेपासून वंचित राहिलेल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पंढरपूर ते शेगाव प्रस्तावित भक्ती रेल्वे मार्गाला गती देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या रेल्वे मार्गामुळे केवळ प्रवासी वाहतुकीची सुविधा निर्माण होणार नसून धार्मिक पर्यटन, व्यापार, औद्योगिक विकास, कृषी अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि दक्षिण-उत्तर भारतातील रेल्वे संपर्काला नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, शेतकरी, पत्रकार आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन रेल्वे कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

देश स्वतंत्र झाल्यापासून भूम-परंडा-वाशी परिसराला रेल्वे जोडणी मिळालेली नाही. रेल्वेच्या अभावामुळे या भागातील नागरिकांना शिक्षण, व्यवसाय, नोकरी, आरोग्यसेवा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते. औद्योगिक व व्यापारी विकासाच्या दृष्टीनेही रेल्वे जोडणी नसणे ही मोठी मर्यादा ठरत आहे. आता मात्र पंढरपूर ते शेगाव भक्ती रेल्वे मार्गाच्या निमित्ताने या भागाच्या विकासाची नवी आशा निर्माण झाली आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान ही महाराष्ट्रातील लाखो भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणारा रेल्वे मार्ग निर्माण झाल्यास वारकरी, भाविक आणि पर्यटकांना मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकते. पंढरपूर, भूम, परंडा, वाशी, मराठवाडा आणि विदर्भातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. 


व्यापार आणि औद्योगिक विकासासाठी रेल्वे महत्त्वाची

भूम-वाशी परिसरातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीने रेल्वे जोडणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.  परिसरात नवीन उद्योग आकर्षित करण्यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता, तयार मालाची वाहतूक आणि बाजारपेठेशी जोडणी या बाबी महत्त्वाच्या आहेत. 


साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

हा परिसर शेतीप्रधान असून ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि कृषी प्रक्रिया उद्योग हे अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. रेल्वे जोडणी झाल्यास साखर, कृषी उत्पादने, औद्योगिक कच्चा माल तसेच खत, बियाणे आणि शेतीसाठी आवश्यक साहित्याच्या वाहतुकीसाठी नवीन पर्याय निर्माण होऊ शकतात. 


शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्यांना भेटणार 

पंढरपूर-शेगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी भूम-परंडा-वाशी भागातील शिष्टमंडळ लवकरच रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती तानाजी पाटील यांनी दिली. 

 
Top