धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी तसेच शहरातील कचरा डेपो शहराबाहेर हलविणे, नियमित स्वच्छता, तुंबलेल्या गटारी व नाल्यांची स्वच्छता आणि इतर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या तीन दिवसीय स्वाक्षरी मोहिमेला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज खाजा नगर येथील शम्स चौक व मदिना चौक परिसरात राबविण्यात आलेल्या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. नागरिकांनी स्वाक्षरी करण्यासोबतच शहरातील विविध समस्याही पोस्टरवर लिहून मांडल्या. यातून शहरातील नागरी सुविधांबाबत नागरिकांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त झाली.

नागरिकांनी नियमित कर भरूनही स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपरिषद प्रशासनाची तसेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून, केवळ कर वसुली न करता शहरातील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उद्या स्वाक्षरी मोहीमचा तिसरा दिवस बार्शी नाका व शांतीनिकेतन येथे राबविला जाणार आहे.

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्यासह प्रशांत पाटील, धनंजय राऊत, खलील सय्यद, ॲड. जावेद काझी, अभिमान पेठे, अंकुश पेठे, अजहर पठाण, मौलाना शौकत, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, अशोक बनसोडे, जयसिंग पवार, ॲड. गणपत कांबळे, हरिदास शिंदे, ॲड. राजूदास आडे, अविनाश रणखांब, पोपट शिंदे, आरिफ मुलानी, बाबा मोमीन, मोइब शेख, दयानंद नागापुरे, हुज्जू शेख आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम पुढील दिवसातही शहरातील विविध भागांत राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन शहराच्या प्रश्नांसाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top