तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी आणि मंदिराच्या सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी केलेल्या व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंदिरातील श्री गोमुख आणि श्री कल्लोळ तीर्थ येथे स्नानाची सुविधा बंद करण्यात आल्याने भाविकांसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या भवानी तीर्थकुंड येथे स्नानाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या तीर्थकुंडातील पाणी अस्वच्छ असल्याच्या तक्रारी असून, स्नानासाठी प्रत्येक भाविकाकडून 30 रुपये शुल्क आकारले जात असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत असून सदरील ठेकेदाराला दंड करावा. अशी मागणी पुढे येत आहे.
शारदीय नवरात्र महोत्सव, अश्विनी पौर्णिमा सोहळा तसेच दीपावलीच्या सुट्ट्यांच्या कालावधीत तुळजापुरात लाखो भाविकांनी हजेरी लावली. मंदिरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी राजे शहाजी महाद्वारातून भाविकांना सोडणे बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर मंदिरातील श्री गोमुख आणि श्री कल्लोळ तीर्थ येथील स्नानाची सुविधाही बंद ठेवण्यात आली. त्यामुळे भाविकांसाठी भवानी तीर्थकुंड हाच स्नानाचा प्रमुख पर्याय उरला होता.
मात्र, या ठिकाणी स्नानासाठी 30 रुपये शुल्क आकारले जात असतानाही स्वच्छ पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाविकांनी केली आहे. तीर्थकुंडातील पाणी घाण आणि अस्वच्छ असल्याने येथे स्नान केल्यानंतर काही भाविकांना त्वचारोग तसेच चर्मरोगाचा त्रास झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे धार्मिक श्रद्धेने तुळजापुरात आलेल्या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
865 कोटींच्या विकास आराखड्याचा उपयोग काय?
तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तब्बल 865 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात भाविकांना साधे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित स्नानाची सुविधा मिळत नसेल, तर एवढ्या मोठ्या विकास आराखड्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिर परिसरातील विकासाबरोबरच भाविकांच्या आरोग्याला आणि मूलभूत सुविधांनाही प्राधान्य देण्याची गरज आहे. सदरील भवानी तीर्थकुंड नगरपालिकेच्या मालकीचे असून, त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर आहे. हिंदुत्वाचा अभिमान सांगणाऱ्या सरकारला भाविकांची गैरसोय दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापुढे भवानी तीर्थकुंडात मोफत स्नानाची व्यवस्था करा अन्यथा शुल्क आकारल्यास स्वच्छ पाणी द्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे.
.jpeg)