उमरगा (प्रतिनिधी)- राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी उमरगा नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते पंढरीनाथ कोणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली आहे. याबाबतचा दोन लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संकटकाळात शासनाच्या मदतकार्यात हातभार लावणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याची भावना ठेवून उमरगा नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते तथा नरवीर तानाजी मालुसरे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ कोणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी भाजपाचे महामंत्री आमदार संजय केनेकर, माजी सहाय्यक आयुक्त तथा भाजपा कार्यकारिणी सदस्य मल्हार मोरे, ॲड. व्यंकटराव गुंड आदी उपस्थित होते.
