वाशी (प्रतिनिधी)- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून वाशी पोलीस स्टेशन, कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग तसेच माळी सरांची श्री करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा व एकता दौडचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाशी फाटा या मार्गावर झालेल्या दौडीला पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे, प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, श्री अकॅडमीचे संचालक शहाजी माळी, क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. रवी चव्हाण, प्रा. शामसुंदर डोके, प्रा. डॉ. बालाजी देवकते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नेताजी देसाई, प्रा. डॉ. पार्थराज क्षीरसागर व प्रा. डॉ. दैवशाला रसाळ यांची उपस्थिती होती. या दौडमध्ये मुलींच्या गटात संजना पारडे हिने प्रथम, स्वाती भाकरे हिने द्वितीय, तर रेणुका थोरबोले हिने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या गटात ज्ञानेश्वर रिटे प्रथम, ओंकार गीते द्वितीय, तर राज गायकवाड याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पोलीस निरीक्षक शंकरराव शिंदे यांच्या हस्ते पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन प्रभारी प्राचार्य प्रा. राजाभाऊ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. महादेव उंद्रे यांनी दोन्ही नेत्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. यावेळी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद करडे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
