धाराशिव (प्रतिनिधी)- मतदार यादीतून कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव वगळले जाऊ नये. तसेच मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये. यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. असे मत मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम.डी.देशमुख यांनी व्यक्त केले.
एम डी देशमुख यांच्या निवासस्थानी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्याच्या मतदार याद्यांमधून मतदारांची नावे कमी होण्याचे प्रकार,मतदार म्हणुन नोंदणी करतांना येणाऱ्या अडचणी तसेच नवीन मतदार नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या नमुना क्रमांक 6 (फॉर्म नंबर 6) मधील नियम व अटी यांचा बारकाईने अभ्यास करण्याची आवश्यकता यावर चर्चा झाली. नेमुन दिलेल्या बिईओ यांनी घरघरात जाऊन मतदार मोहिम पार पाडली. त्याच प्रमाणे नवीन मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी. नवीन मतदारांनी नियमानुसार नोंदणी करावी. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदार जागृती ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता सातत्याने होणे गरजेचे आहे. कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच येत्या 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृती रॅली आयोजित करण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. यावेळी मतदार जनजागरण समिती अध्यक्ष एम.डी. देशमुख,सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे उपस्थित होते.
