वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची आढावा बैठक समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात उपचार कक्ष सज्ज ठेवणे, आशा स्वयंसेविका व आरोग्य सेविकांकडे आवश्यक औषधे आणि प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करणे, तसेच गावांतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश तळेकर यांनी दिले. दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला. यावेळी आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्या मांडल्या. या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून पुढील दोन महिन्यांत टप्प्याटप्प्याने त्या पूर्ण करण्याची ग्वाही सौ. सविता तळेकर यांनी दिली.

या बैठकीस विकास तळेकर (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी तथा विधान परिषद सदस्य प्रतिनिधी), सभापती प्रतिनिधी समाधान मोटे, सेवाभावी संस्था प्रतिनिधी पोपट सुरवसे, तालुका आरोग्य अधिकारी, पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सर्व उपकेंद्रांच्या आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

 
Top