धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी,व्यावसायिक,महिला बचत गट आणि लघुउद्योजकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांबरोबरच बँकेतर वित्तीय संस्था (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या) महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.वाहन खरेदी,शेतीसाठी ट्रॅक्टर व कृषी उपकरणे,गृहकर्ज,वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज तसेच लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या विविध संस्थांच्या सेवांचा लाभ नागरिकांना घेता येतो.जिल्ह्यातील प्रमुख बँकेतर वित्तीय संस्थांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी,या उद्देशाने 12 हून अधिक प्रमुख राष्ट्रीय वित्तीय संस्थांचा समावेश असलेली मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. अनधिकृत कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था आणि मोबाईल ॲप्सपासून सावध रहा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
धाराशिव शहरासह उमरगा,भूम, कळंब,तुळजापूर आणि जिल्ह्यातील अन्य भागांमध्ये विविध वित्तीय संस्थांच्या शाखा अथवा सेवा उपलब्ध असल्याची माहिती या मार्गदर्शिकेत देण्यात आली आहे.वाहन व व्यावसायिक कर्ज,किरकोळ व गृहकर्ज, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म वित्तपुरवठा अशा चार प्रमुख वित्तीय क्षेत्रांतील संस्थांचा यामध्ये समावेश आहे. मात्र,कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेण्यापूर्वी तिची भारतीय रिझर्व्ह बँकेकडील नोंदणी,कर्जाच्या अटी, व्याजदर आणि संबंधित शाखेची अधिकृतता तपासणे आवश्यक आहे.
वाहन खरेदी,व्यावसायिक वाहतूक,शेतीसाठी यंत्रसामग्री आणि व्यवसाय विस्तारासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेड,महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस,चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी,एल अँड टी फायनान्स लिमिटेड आणि सुंदरम फायनान्स लिमिटेड यांचा समावेश आहे. कर्ज घेण्यापूर्वी आरबीआय नोंदणीची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. आर्थिक गरजांसाठी योग्य संस्था निवडून सुरक्षित व्यवहाराला प्राधान्य द्या असे आवाहन करण्यात आले आहे.