धाराशिव (प्रतिनिधी)-  देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सशक्त,निरोगी आणि विकसित राष्ट्राच्या उभारणीसाठी युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा विधायक कार्यासाठी वापरावी.केंद्र शासनाच्या नशामुक्त विकसित भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन नशामुक्त राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

‌‘नशामुक्त युवा  विकसित भारतासाठी' या संकल्पनेवर आधारित विकसित भारत नेतृत्व संवाद 2027 अंतर्गत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन धाराशिव येथील पुष्पक मंगल कार्यालयात करण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. युवक ही देशाची मोठी शक्ती आहे.या शक्तीला योग्य दिशा मिळाल्यास राष्ट्राच्या प्रगतीला अधिक गती मिळू शकते. नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, जिल्ह्यातील युवा पिढीने या सामाजिक परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावावी, असा संदेश या महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे,तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीची भावना विकसित व्हावी,या दृष्टीने युवा महोत्सवाचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते.


युवकांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील युवक-युवतींनी सहभाग नोंदविला.युवा पिढीच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासोबतच नशामुक्तीचा संदेश समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा महोत्सव एक प्रभावी व्यासपीठ ठरला.युवकांच्या प्रतिभेला संधी देतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. युवा महोत्सवासाठी परीक्षक म्हणून प्रा.मिलिंद माने,डॉ. उषा कांबळे,माधुरी सलगर, वंदना कुलकर्णी,प्रा.प्रशांत गुरव,राजेंद्र भोसले,एस. टी. गांगुर्डे, एस.डी.भोसले, योगेश अत्रे,नितीन तुपसमलिंदर आणि अविनाश ताटे उपस्थित होते.

महोत्सवाच्या यशस्वितेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे,अक्षय बिरादार,राज्य क्रीडा मार्गदर्शिका डिंपल ठाकरे, वरिष्ठ लिपिक सुरेश वालवडकर,किशोर भोकरे, सुनील घोगरे,शिपाई जान्हवी पेठे,सुरेश कळमकर आणि व्यंकटेश दंडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर यांनी केले, तर क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी आभार मानले. युवकांच्या कलागुणांचा आविष्कार,सामाजिक जाणिवेची जोड आणि नशामुक्त राष्ट्रनिर्मितीचा संदेश यांचा सुंदर मिलाफ या युवा महोत्सवाच्या माध्यमातून घडून आला.विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सहभाग अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला.


 
Top