भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील रामेश्वर येथील दलित वस्ती अर्थात भीमनगरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास 2 डिसेंबर रोजी भूम पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दशरथ विश्वनाथ नागटिळक यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी बुधवारी (ता. 25) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. 

भीमनगरमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. टंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू करावा किंवा खासगी विहिरीचे अधिग्रहण करावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली. मात्र, गावात ग्रामसेवक उपलब्ध नसल्याचे कारण सांगून प्रशासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाणीटंचाईमुळे वस्तीतील नागरिकांचे हाल होत असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. अन्यथा वस्तीतील नागरिकांसह पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागटिळक यांनी दिला आहे.


 
Top