भूम (प्रतिनिधी)- भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून देशातील विविध केंद्रीय सेवांमध्ये अधिकारी म्हणून निवड झालेल्या सहा मान्यवर अधिकाऱ्यांचे माणकेश्वर नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत माणकेश्वरच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन या अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भावी अधिकाऱ्यांच्या स्वागताचा मान माणकेश्वर गावाला मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय ग्रामीण जीवनशैली, ग्रामव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज तसेच ग्रामीण भागातील शासकीय योजनांची अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या अधिकाऱ्यांचा सात दिवसांचा ग्रामीण अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यांतर्गत हे अधिकारी माणकेश्वर येथे दाखल झाले आहेत. सध्या त्यांचे विशेष पायाभूत प्रशिक्षण सुरू असून, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी डॉ. मंजिमा पी (आयपीएस), हिमांशू द्विवेदी (आयएफएस), अंकन बोहरा (आयएफएस), शिवांगी यादव (आयईएस), यश विशेन (आयआरएस) आणि स्पर्श वर्मा (आयएएएस) या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध केंद्रीय सेवांमध्ये निवड झालेल्या या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्याची संधी या दौऱ्यामुळे मिळणार आहे. यावेळी किशोर अंधारे, मनोज अंधारे, पंचायत समिती सदस्य विशाल अंधारे, सुदाम पाटील, आबा माळी, प्रकाश डॉक्टर, अंजार शेख, अंकुश अंधारे, बालाजी अंधारे, प्रशांत किरने, ग्रामसेवक नलवडे, प्रशासक गलांडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
