भूम (प्रतिनिधी)-  भारतीय संविधान दिन आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतिदिनानिमित्त भूम येथील वकील मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल 32 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. भैरवनाथ ब्लड सेंटर, परांडा यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला. देशाच्या संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना रक्तदानातून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एकसंघ ठेवणारे संविधान दिले. संविधानामुळे समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये रुजण्यास बळ मिळाले. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग संविधानाने दिला आहे. या संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व शहीद जवानांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अतुलनीय शौर्याचे, देशभक्तीचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले. या रक्तदान शिबिराला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. आर. सुकाळे, ॲड. एस. बी. हुंबे, ॲड. अमृता गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वकील मंडळाचे सचिव मकरंद सोने, अरविंद हिवरे, रमेश काळे, बी. डी. नागरगोजे, निळू मोठे यांच्यासह अनेक वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. 


 
Top