धाराशिव (प्रतिनिधी)- बालकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे,त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे आणि सुरक्षित बालपणासाठी कायद्याचे संरक्षण मिळवून देणे,या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद यांच्या वतीने वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ‘सुरक्षित बचपन अभियान अंतर्गत विशेष कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध,सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण,बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालकांच्या कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,2012 (पोक्सो) अंतर्गत बालकांचे हक्क अबाधित राखणे आणि त्यांना भयमुक्त व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शालेय स्तरावर कायदेविषयक जनजागृती होणे आवश्यक आहे.याच उद्देशाने 31 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती. अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनात पार पडला.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे उपमुख्य न्यायरक्षक अभय पायुडकर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री. पायुडकर यांनी ‘सुरक्षित बचपन अभियाना'च्या उद्देशांवर सविस्तर प्रकाश टाकला.बालकांना स्वतःच्या हक्कांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य विद्यार्थ्यांनी बाळगावे.अन्याय किंवा अत्याचार सहन न करता त्याबाबत योग्य व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.
बालकांचे शारीरिक,मानसिक आणि कायदेशीर संरक्षण करण्यासाठी विविध कायद्यांमध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला न घाबरता आपल्या हक्कांसाठी पुढे आले पाहिजे.बालकांच्या संरक्षणासाठी कायदा सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही श्री. पायुडकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धाराशिव सायबर गुन्हे शाखेचे श्री. पी.एस.शेख यांनी डिजिटल युगातील वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मोबाईल,इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना निर्माण होणारे धोके,सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक, वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचे महत्त्व तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क कसा साधावा, याविषयी त्यांनी सोप्या भाषेत उदाहरणांसह माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना सतर्क राहावे. इंटरनेटवरील प्रत्येक माहिती किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता आणि योग्य खबरदारी आवश्यक असल्याचे श्री.शेख यांनी सांगितले.
बाल कल्याण समिती,धाराशिवच्या सदस्या श्रीमती एस.एल.माळी यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम आणि त्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. बालविवाह ही समाजाला लागलेली अनिष्ट प्रथा असून,तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदी,कायद्याचे उल्लंघन केल्यास होणारा दंड आणि शिक्षेचे स्वरूप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे.समाजात बालविवाहाची घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहन श्रीमती माळी यांनी केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळा, वडगावच्या मुख्याध्यापिका श्रीमती.ज्योती राऊत,बाल कल्याण समिती,धाराशिवचे केस वर्कर अमर भोसले,बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती. एस.एल.माळी,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भालचंद्र कोकाटे यांच्यासह शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक श्री. भालचंद्र कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती.ज्योती राऊत यांनी उपस्थित मान्यवर,मार्गदर्शक, शिक्षक,कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींचे आभार मानले. बालकांचे हक्क,त्यांचे कायदेशीर संरक्षण,सायबर सुरक्षितता आणि बालविवाह प्रतिबंध यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.