धाराशिव (प्रतिनिधी)- बालपण हे निर्भय,सुरक्षित आणि आनंददायी असावे.मात्र, बालकांवरील अत्याचार, बालविवाह आणि विविध प्रकारच्या गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी केवळ कायदे अस्तित्वात असून चालणार नाही, तर त्या कायद्यांची माहिती प्रत्येक बालकापर्यंत पोहोचणेही तितकेच आवश्यक आहे.बालकांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद यांच्या वतीने सांजा येथील शिवाजी विद्यालयात 31 ऑक्टोबर रोजी ‘सुरक्षित बचपन अभियान' अंतर्गत विशेष कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,2012 (पोक्सो) अंतर्गत बालकांचे हक्क अबाधित राखणे,त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि शालेय स्तरावर कायदेविषयक साक्षरता वाढविणे, या उद्देशाने 31 ऑक्टोबर 2026 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. भाग्यश्री पाटील यांनी शिवाजी विद्यालय,सांजा येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सहाय्यक न्यायरक्षक श्री.शशांक गरड यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री. गरड यांनी सुरक्षित बचपन अभियानाच्या उद्देशांची सविस्तर माहिती दिली.बालकांना आपल्या हक्कांची जाणीव असणे ही त्यांच्या सुरक्षिततेची पहिली पायरी आहे.बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्यामध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याविरुद्ध आवाज कसा उठवावा, कोणाकडे मदत मागावी आणि आपल्या हक्कांचे संरक्षण कसे करावे,याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बालकांच्या शारीरिक,मानसिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी विविध कायद्यांमध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.त्यामुळे अन्याय किंवा अत्याचाराच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता योग्य व्यक्ती अथवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी. बालकांच्या संरक्षणासाठी कायदा सदैव त्यांच्या पाठीशी आहे,असा विश्वास श्री.गरड यांनी यावेळी व्यक्त केला. बाल कल्याण समिती, धाराशिवच्या सदस्या श्रीमती. पाटील यांनी बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालविवाह ही समाजाला लागलेली अनिष्ट प्रथा असून,तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालविवाहामुळे बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.त्यामुळे या प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बाल कल्याण समितीचे सदस्य श्री. डी.टी.काळुंके यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. बालविवाहासंदर्भातील कायदेशीर तरतुदी,कायद्याचे उल्लंघन केल्यास होणारा दंड आणि शिक्षेचे स्वरूप याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. बालविवाह रोखणे ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे.बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहून पुढाकार घेतला पाहिजे,असे आवाहन श्री.काळुंके यांनी केले. बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याची माहिती शालेय जीवनापासूनच मिळणे आवश्यक आहे.स्वतःच्या हक्कांची ओळख, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची तयारी आणि कायदेशीर संरक्षणाची जाणीव यामुळे बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते.याच अनुषंगाने या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालहक्क,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांविषयी माहिती देण्यात आली.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत बालकांच्या सुरक्षिततेबरोबरच सायबर गुन्ह्यांसारख्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वही या अभियानाच्या उद्देशांमध्ये अधोरेखित करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमास शिवाजी विद्यालय, सांजाचे मुख्याध्यापक श्री.जे.डी.माळी, बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती.पाटील,बाल कल्याण समिती,धाराशिवचे सदस्य श्री.डी. टी.काळुंके,शिवाजी विद्यालयाचे शिक्षक श्री.एस.एस.हिप्परकर यांच्यासह शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक श्री. एस.एस.हिप्परकर यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.सूत्रसंचालनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.डी.माळी यांनी उपस्थित सर्व मान्यवर,मार्गदर्शक,शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनींचे आभार मानले. बालकांना त्यांच्या हक्कांची ओळख करून देणे,कायद्याविषयी असलेली भीती दूर करणे आणि अन्यायाविरुद्ध सजग राहण्याचा संदेश देणे,या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
