तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील पीएमश्री जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तय्यबअली शहा यांना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिनाच्या औचित्याने मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर,छत्रपती संभाजीनगर येथे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन मुंबई यांच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्टेट बेस्ट टीचर अवॉर्ड 2026 राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वरूपात सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त आय. ए. एस. अधिकारी तथा सिने अभिनेते अनिल मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभाग प्रमुख डॉ. कीर्ती नलिनी जावळे, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एम. ए.गफार, एकता फाउंडेशन परभणी चे संस्थापक पठाण अजमत खान, शिक्षक नेते युनूस अन्सारी, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शेख शागीर्द अहमद, उपक्रमशील शिक्षक शेख साजिद अहमद, सहशिक्षक डॉ. मौला इस्माईल साब शेख उपस्थित होते.सदर पुरस्कार शहा यांच्या उत्तम कारकीर्द आणि आदर्श शाळा व्यवस्थापनाबद्दल देण्यात आलेला आहे.
