धाराशिव (प्रतिनिधी)-  सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, त्यांच्या कायदेशीर व प्रशासकीय समस्या गावपातळीवरच मार्गी लागाव्यात आणि शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथे ‌‘विधी सहाय्यता केंद्रा'चे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्या विविध लोकोपयोगी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित 60 दिवसांच्या विशेष महामोहिमेचा शुभारंभही यानिमित्ताने झाला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना त्यांच्या कायदेशीर व प्रशासकीय अडचणी मांडण्यासाठी गावातच हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे न्याय आणि प्रशासन आता गावाच्या दारी अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने ही विशेष महामोहीम राबविण्यात येत आहे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री  देव यांच्या मार्गदर्शनाखाली खामकरवाडी (ता.वाशी) येथे विधी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या महामोहिमेस जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ही मोहीम 16 नोव्हेंबर 2026 ते 14 जानेवारी 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबादच्या सचिव भाग्यश्री पाटील होत्या. यावेळी त्यांनी आगामी 60 दिवसांत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने खामकरवाडी गावात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांचे मार्गदर्शन झाले. या उद्घाटनप्रसंगी वाशीचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) डी.जी.जगताप, उपजिल्हाधिकारी  प्राजक्ता पाटील, मंडळ अधिकारी विजयमाला ढवारे, ग्राम महसूल अधिकारी अनुराधा देशमुख, कृषी सहायक पंडित, खामकरवाडीचे सरपंच गंगाराम शिंदे, ग्रामसेवक सरवदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड.अभय पाथरूडकर यांनी केले व उपस्थितांचे आभारही मानले.


 
Top