धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे हिंदी संशोधन विभागांतर्गत प्रा. परमेश्वर राम कोळी हे संशोधन करत असलेले, जगदीश चंद्र माथुर यांच्या नाट्य साहित्या विश्वातील संवेदना या विषयावर विद्या वाचस्पतीसाठी पूर्व मौखिकी संपन्न झाली. यावेळी डॉ.अशोक मर्डे यांनी वरील प्रतिपादन केले,ते म्हणाले की, जगदीश चंद्र माथुर यांनी हिंदी साहित्यातील नाटकाला नविन उभारी दिली, भूतकाळातील पारंपरिक पात्रांचा आधार घेऊन त्यांनी वर्तमानाचा वेध घेतला, भारतातील इतिहासाची ओळख ही नद्या, पर्वत, पुरातन मंदिरे, पुरातन वास्तू यांपासून होते, एकेकाळी घडलेली घटना आज आपण इतिहासात वाचतो,त्यावर संशोधन करतो आणि समाजासमोर नवीन कांहीं तथ्य ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, जगदीश चंद्र यांनी एक प्रसिद्ध नाटक लिहिले कोणार्क नावाचे , यामध्ये सूर्य मंदिर निर्माण करत असताना त्यावेळी त्या कलाकारांनी जीव ओतून ही असामान्य कलाकृती निर्माण केली,तिथे त्यांना झालेले कष्ट,त्यांची कल्पनाशक्ती,त्यांची मानसिकता कशाप्रकारे होती याचे अचूक वर्णन त्यांनी केले आहे,याच पद्धतीने त्यांच्या पहला राजा,शारदिया, कुंवर सिंह की टेक, रघुकुल रीति या नाटकांमध्ये त्यांनी इतिहासातुन भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.कला किंवा नाटक हे समाजाच्या मनोरंजनासाठी जरी लिहिले गेले असले तरी त्यांचा संबंध मानवी मनाशी जोडला जातो आणि तेंव्हाच आपली संस्कृती आणि परंपरा मनामध्ये भिनली जात असते, आणि म्हणूनच आज अशा विषयांवर वारंवार संशोधन होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी संशोधन केंद्र प्रमुख डॉ.केशव क्षीरसागर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सी.आर.दापके, डॉ.रामकृष्ण बदने,शोध निर्देशक डॉ.एन.एन.बोईनवाड , प्रा विवेकानंद चव्हाण, डॉ.शितल गायकवाड यांच्या सह सर्व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
