धाराशिव (प्रतिनिधी)- बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील निरागस आणि आनंदाचा काळ असतो. या वयात बालकांना सुरक्षित वातावरण, शिक्षणाच्या समान संधी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळणे आवश्यक आहे.बालकांवरील लैंगिक अत्याचार, सायबर गुन्हे आणि बालविवाहासारख्या सामाजिक समस्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कायदेविषयक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे.बालकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि कायदेशीर संरक्षणासाठी कायदा सदैव त्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे उपमुख्य न्यायरक्षक अभय पायुडकर यांनी व्यक्त केला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वरूडा येथे ‌‘सुरक्षित बचपन अभियाना'अंतर्गत विशेष कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्य न्यायरक्षक अभय पायुडकर यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,2012 (पोक्सो कायदा) अंतर्गत बालकांचे हक्क अबाधित राखणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.त्यासाठी शालेय स्तरापासूनच कायदेविषयक जनजागृती होणे काळाची गरज बनली आहे.याच उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री.पायुडकर यांनी ‌‘सुरक्षित बचपन अभियाना'च्या उद्दिष्टांवर सविस्तर प्रकाश टाकला.बालकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याविरोधात आवाज कसा उठवावा, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याने विविध संरक्षणात्मक तरतुदी केल्या असून,त्यांची माहिती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.बालकांचे शारीरिक,मानसिक आणि कायदेशीर संरक्षण करण्यासाठी कायदा सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बाल कल्याण समिती, धाराशिवच्या सदस्या श्रीमती डी. एस.जहागीरदार यांनी बालविवाहाच्या गंभीर परिणामांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.बालवयात विवाह झाल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात.बालविवाह ही समाजाला लागलेली अनिष्ट प्रथा असून,तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी बाल कल्याण समिती, धाराशिवच्या सदस्या डी. एस.जहागीरदार यांनी बालविवाहाच्या गंभीर परिणामांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.बालविवाहामुळे मुला- मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.बालवयात विवाह झाल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात.बालविवाह ही समाजाला लागलेली अनिष्ट प्रथा असून,तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले. बाल कल्याण समितीच्या सदस्या विभावरी खुणे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. 

बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी, त्यांचे उल्लंघन केल्यास होणारा दंड आणि शिक्षेचे स्वरूप याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.बालविवाह रोखणे ही केवळ प्रशासन किंवा कायद्याची जबाबदारी नसून,प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. समाजातील अशा अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सजग राहून आपली जबाबदारी पार पाडावी,असे आवाहन त्यांनी केले.

या जनजागृती कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वरूडा येथील मुख्याध्यापिका श्रीमती वनमाला परशुराम लोखंडे,बाल कल्याण समितीच्या सदस्या श्रीमती डी.एस.जहागीरदार,बाल कल्याण समितीच्या सदस्या तथा संरक्षण अधिकारी श्रीमती. विभावरी खुणे,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.प्रकाश पवार यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री.प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका श्रीमती.वनमाला परशुराम लोखंडे यांनी उपस्थित मान्यवर,मार्गदर्शक,शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायद्यांची माहिती,बालविवाहाचे दुष्परिणाम आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित आणि भयमुक्त बालपण घडविण्याच्या दृष्टीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. 


 
Top