धाराशिव (प्रतिनिधी)-  आपल्या कष्टातून साखरेला गोडवा देणाऱ्या ऊसतोड कामगारांचे जीवन सुसह्य करणे ही प्रशासनासह साखर कारखान्यांचीही जबाबदारी आहे.या कामगारांना सुरक्षित निवारा, शुद्ध पिण्याचे पाणी,आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये,यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी व साखर कारखाना प्रशासनाने संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीमती.मनीषा बांगर,सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर ),जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त,सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, ऊसतोड कामगारांची नोंदणी करणाऱ्या स्मार्ट कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक,शिक्षण विस्तार अधिकारी मैदर्गी, ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी पवार यांच्यासह जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांची प्रत्यक्ष तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे व पंचायत समित्यांचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांची ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती होती.

यावेळी विविध विभागाच्या अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधीनी तसेच साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती देण्यात आली. तुळजाभवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी कामगारांच्या विविध अडचणी व समस्या मांडल्या. ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या दरात वाढ करावी.अपघातग्रस्त तसेच नुकसान झालेल्या ऊसतोड कामगारांना वेळेत नुकसानभरपाई मिळावी. साखर कारखाना परिसरात कामगारांसाठी चांगल्या दर्जाची स्नानगृहे आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

 
Top