धाराशिव (प्रतिनिधी)- उदरनिर्वाहासाठी गाव-घर सोडून ऊसतोडीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये,त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे,यासाठी राज्य शासनामार्फत संत भगवान बाबा मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे मंजूर करण्यात आली आहेत.जिल्ह्यात सहा वसतिगृहांना मंजुरी असून, त्यांची एकूण प्रवेश क्षमता 600 विद्यार्थ्यांची आहे. सद्यःस्थितीत 76 विद्यार्थ्यांना वसतिगृहांत प्रवेश देण्यात आला आहे.

कळंब येथील संत भगवान बाबा मुलांचे शासकीय वसतिगृह आणि मुलींचे शासकीय वसतिगृह यांची मंजूर प्रवेश क्षमता प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांची असून, उपलब्ध इमारतींची क्षमता प्रत्येकी 60 विद्यार्थ्यांची आहे. मुलांच्या वसतिगृहात 50,तर मुलींच्या वसतिगृहात 26 विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला आहे.

भूम येथील संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक,लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ,पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.भूम येथील संत भगवान बाबा मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.मात्र प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या.त्यानुसार संबंधित इमारत मालकास त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

परंडा येथील संत भगवान बाबा मुलांचे आणि मुलींचे शासकीय वसतिगृह प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे मंजूर आहे.दिनांक 13 मे 2026 अन्वये मंजूर वसतिगृहे धाराशिव येथे स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सहा मंजूर वसतिगृहांची एकूण प्रवेश क्षमता 600 विद्यार्थ्यांची असून,उपलब्ध माहितीनुसार इमारत क्षमता 240 विद्यार्थ्यांची आहे.आतापर्यंत 76 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.


आई-वडिलांच्या कष्टांना मुलांच्या शिक्षणाची जोड

ऊसतोडीसाठी स्थलांतर करताना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता अनेक कामगारांना सतावत असते. आर्थिक परिस्थिती आणि स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत,यासाठी शासकीय वसतिगृहांची सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

आई-वडील ऊसतोडीसाठी परगावी असले,तरी त्यांच्या मुलांना शिक्षणात सातत्य राखता यावे,सुरक्षित वातावरणात अभ्यास करता यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे,यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना आशेचा किरण ठरणारी आहे.


आई-वडिलांच्या हातात कोयता; मुलांच्या हातात लेखणी

आपल्या वाट्याला आलेले कष्ट मुलांच्या वाट्याला येऊ नयेत,त्यांनी शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आयुष्यात प्रगती करावी,ही प्रत्येक ऊसतोड कामगाराची मनापासून इच्छा असते.आई-वडील ऊसाच्या फडात घाम गाळत असताना त्यांच्या मुलांना सुरक्षित वातावरणात राहून शिक्षण घेता यावे,यासाठी शासकीय वसतिगृहांची सुविधा महत्त्वपूर्ण ठरत आहे. स्थलांतरामुळे शिक्षणाची वाट अर्धवट राहू नये आणि परिस्थितीमुळे मुलांच्या स्वप्नांना मर्यादा पडू नयेत, यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना कष्टकरी कुटुंबांच्या नव्या पिढीसाठी आशेचा किरण ठरत आहे.


 
Top